Thursday, 15 October 2015

प्रेम हाच खरा धर्म



माझे चूक कि बरोबर असा विचार केला तर नुसते चूकच नाही तर मी गाढव ठरलो . 
ती एका सामान्य कोकणस्थ कुटुंबातील ब्राह्मण युवतील दिसायला सुंदर. अगदी परीच. लहानपणापासून हुशार. तल्लख स्मरणशक्तीने चकाकणारी हुशारी. तिचे लांब केस, दिसण्यातील आणि चाल्ण्याबोल्ण्यातील गोडवा. "आप के पैर बहोत हसीन है, इसे जमि पे मत रखीयेगा" ह्या वाक्याला अगदी साजेशी. पदवीधर झाल्यवर पुढील शिक्षणासाठी पुण्यात गेली. तिचे नाव मधुर . मधुर तिथे भरपूर शिकली. तिथेच तिचे एका ख्रिश्चन मुलाशी सुत जुळले. त्याचे शिक्षण कमी. अंगापिंडाने मजबूत पण दिसायला चांगला पण रंगाने काळा. हि गोरीपान, देखणी, सुशिक्षित, सुसंस्कारित. त्यांचे प्रेम कुठल्या अंगाने जुळले आणि कुठल्या बेसवर फुलले माहित नाही, पण ते लग्नापर्यंत पोहोचले. अगदी "चांगल्या झाडावर माकड चढले " म्हणतात तसे. गुपचूप लग्न करून आली. जावयासकट मुलीला दारात बघून ते मध्यमवर्गीय संस्कारांचे घरदार पत्त्याच्या घरासारखे कोलमडले. रागाने फुललेल्या वडिलांनी मुलीला घरातून हक्लीन दिले. वडिलांना तर heart attack येउन त्यांना दवाखान्यात दाखल करावे लागले. आईचे बिपी वाढले म्हणून ती दवाखान्यात. घरात एकटी लहान बहिण. नातेवाईक आले. चिघळलेली परिस्थिती त्यांनी हाताळली. त्या घराने आपल्या मुलीशी संबंध तोडून टाकले. सुखवस्तू मध्यमवर्गीय घरातून तिचा प्रवास झोपडपट्टी सारख्या एका वसाहती मधील एका तीन खोल्यांच्या घरात चालू झाला.
ह्या सगळ्याचा परिणाम लहान बहिणीवर झाला. तिच्यावर वडिलांची देखरेख चालू झाली. तिला क्लासला, कॉलेजला सोडणे, आणणे हे आळीपाळीने आईवडील करू लागले. फुलायला आलेल्या वयात ती बिचारी कोमेजून गेली. कॉलेज संपता संपता वडिलांनी तिचे लग्न तिच्यापेक्षा तब्बल वर्षाने मोठ्या असलेल्या जातीमाधल्या मुलाशी लाऊन दिले. अगदी विद्रूप जोड होता तो.
वर्षे गेली होती. इकडे पुण्यात त्या ख्रिश्चन नेल्सनशी विवाह केलेली ती मोठी मुलगी तिचा संसार चालवत होती. तिला जुळ्या मुली झाल्या. जेनिफर आणि रोझी अशी त्यांची नावे. अचानक एके दिवशी मोठी मुलगी आजारी पडली, तिला दवाखान्यात दाखल केले, आणि कळले कि तिच्या दोन्ही किडन्या बाद झाल्यात. इकडे आई वडिलांना हि माहिती कळवण्यात आली, पण त्यांनी फोनवर नेल्सनला सांगितले कि आम्हाला एकच मुलगी होती, आणि तिचे लग्न आम्ही आमच्या हाताने लाऊन दिलेय, आमची दुसरी मुलगी आम्हाला मेलिय आणि आम्ही तिला मेलोय. तिने हे ऐकले तेव्हा तिला फार धक्का बसला असेल. तिची तब्येत दिवसेंदिवस खालावत होती, नेल्सन, त्यांचे भाऊ टोनी, रिचर्डस, अम्रोस, रोबर्ट , रॉबिन आणि त्यांच्या बायका जाक्लीन , ट्रेसा , मेरी ह्यांनी मधुरावर उपचार सुरु केले. तिला आणि तिच्या दोन्ही लहान मुलीना ते कुटुंब तळहाताच्या फोडासारखे जपत होते, घोरपडी भागातील सेन्ट जोसेफ चर्चमध्ये मधुराच्या आयुष्यासाठी प्रार्थना चालू झाल्या. नोकरी निमित्ताने ती पुण्यात भरपूर फिरायची आणि ड्रायव्हर असलेला तिचा नवरा देखील कामानिमित्ताने भरपूर फिरायचे , पण आता हडपसर - सोलापूर रोड, बी. टी, कवडे रोड ,पुणे स्टेशन , ससून हॉस्पिटल आणि सेन्ट जोसेफ चर्च ह्याभोवतीच त्यांचे आयुष्य फिरत होते. नवर्याची किडनी तिला match झाली नाही, मग सासूने तिला किडनी दिली. आता ति बरी होतेय. तिच्या दोन्ही लहान मुलीना तिच्या जावा आणि नणंद ह्यांनी अगदी स्वतःच्या मुलीसारख्या सांभाळल्या आणि सांभाळत आहेत, त्या जुळ्या मुलींची शाळा, डबे, क्लास लाड आणि आईचे प्रेम ह्यात कशातही कसूर पडली नाही. आणि पडतही नाहीये. 
एक ब्राह्मण म्हणून मला तिचा राग होता कि एका सुसंस्कारित ब्राह्मण सुंदर उच्चशिक्षित मुलीने एका विजोड अशा ख्रिश्चन मुलाशी लग्न केले म्हणून. पण आज पुण्यात तिची तब्येत बघायला म्हणून दवाखान्यात गेलो आणि माझ्या डोळ्यावरील आणि डोक्यामधील सर्व जळमटे उडून गेली. एका ब्राह्मण मुलीला आपली सून मानल्यावर तिच्या उपचारासाठी पाण्यासारखा पैसा ओतणारी ति गरीब माणसे, तिला किडनी देणारी आईसमान सासू, तिच्या मुलींची काळजी आगदी आपल्या मुलींसारखी घेणाऱ्या तिच्या जावा आणि नणंदा, भावजयच्या आजारपणासाठी जादा कामे करून नेल्सनला पैसा पुरवणारे त्यांचे एडविन, रिचर्डस, रॉबिन, अम्रोस , रोबर्ट हे भाऊ. आणि दवाखान्यात रोज मारून दुध, नष्ट, जेवणाचे डबे पुरवण्यासाठी हेलपाटे मारणारे नेल्सनचे थकलेले वडील.
आहो कसली जात, कसला धर्म आणि कसचे काय ? एकमेकातील प्रेम हाच खरा धर्म. तीच खरी जात. आज पुण्यात एका ख्रिश्चन घरात बसून मी नातेसंबंध, जातपात, धर्म ह्याची बेरीज वजाबाकी करतोय. अजून कोणत्याची निकषाला आलेलो नाही. मोठ्या बहिणीच्या आंतरधर्मीय लग्नामुळे आलेल्या बंधनांमुळे अकाली प्रौढ झालेली, योउवनवस्थेतिल अनेक आनंदांवर पाणी सोडावे लागणारी तिची धाकटी बहिण, हरवल्यासारखी वाटणारी तिची आई, खचलेले वडील, सगळे डोळ्यापुढे उभे राहतायत. 
कधीकधी कोण चूक आणि कोण बरोबर हे ठरवता येत नाही हेच खरे.