Thursday, 15 October 2015

गरजूंना मदत



कुणी पोस्ट लाईक करावी किंवा माझे कौतुक करावे आणि आपण आपला मोठेपणा मिरवावा म्हणून मी हि पोस्ट लिहित नाहीये तर समाजातील एक भयाण वास्तव तुमच्यासमोर यावे आणि तुम्ही आपल्या पद्धतीने मदत करावी म्हणून हे लिहितोय.
एका हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. तिथे एका सामाजिक संस्थेच्या सहकार्याने किडनी पेशंट साठी डायलिसीस युनिट सवलतीच्या दरात चालू आहे. आमच्या आगटे साहेबांच्या वाढदिवसाला मी कुठलेतरी सामाजिक काम करत असतो, ह्यावेळी त्या युनिटला मदत करायची असे ठरवले होते. तिथे गेल्यावर हॉस्पिटलमधील रीसेप्श्निस्त कडे त्या युनिटची माहिती विचारली आणि मला काही आर्थिक मदत करायची आहे असे सांगितले. ती मला तिथे घेऊन गेली. तेथील संबंधित माणसाशी माझे झालेले बोलणे तिने ऐकले. नंतर मी बाहेर पडताना तिला धन्यवाद द्यायला गेलो तर तिने मला एक सूचना केली कि तुम्ही ह्या युनिटला मदत केलीत तरी तिथे अनेक बडे लोक देखील सवलतीचा फायदा उपटून घेत असतात. दोन पेशंट आहेत, थोरात आणि घोरपडे. थोरात ह्यांना ह्या जगात कोणीही नाही. आई, वडील, भाऊ , बहिण कोणी नाही. शिक्षण कमी. काहीबाही काम करून डायलिसीस पुरते पैसे जमवून ते डायलिसीस करायला येतात, अनेकदा पैसे जमले नाहीत म्हणून डायलिसीसची तारीख चुकते. दुसरे घोरपडे, त्यांची शेती आहे. मुलगा चौथीत आणि मुलगी पहिलीत आहे. थोडी थोडी शेती विकून डायलिसीस चालू आहे. खेडेगावातून शहरातील ह्या हॉस्पिटलमध्ये डायलिसीस करायला यायला देखील पैसे नसतात कधी कधी. दोन्ही पेशंट जास्तीतजास्त - वर्षे जगतील. तुम्ही त्या दोघांना हे पैसे दिलेत तर जास्त बरे होईल असे तिने मला सुचवले. ( आपले नेमून दिलेलं काम करताना देखील किती समर्पित आणि सहानुभूतीपूर्वक दृष्टीकोन जपला होता तिने ) . तिचे म्हणणे मला पटले. आज ते थोरात पेशंट डायलिसीसला आले होते म्हणून गाठ घेतली. वाईट वाटले. मी देणार असलेले पैसे मी त्या डायलिसीस करणाऱ्या युनिटच्या माणसाच्या हातात दिले, त्याने पेशंटला बोलावले, अंगावर फटके कपडे, मृत्यूची उमजलेली चेहऱ्यावरील छाया, डोळ्यातील दयनीय भाव. त्यांना सांगण्यात आले कि तुमच्या पुढच्या डायलिसीस चे पैसे इथे मुळे ह्यांनी भरले आहेत, आता डायलिसीस चुकवू नका. तो पेशंट पाया पडायला लागला आणि त्याच्या कृतीने मला तिथे रडायला आले. आता शनिवारी घोरपडे पेशंट डायलिसीस करायला आले कि त्यांची गाठ घेईन आणि त्यांना काही मदत देईन. हॉस्पिटल स्टाफने मला सांगितले कि पैसे देताना तुमचा फोटो काढा, कारण लोक इथे वाढदिवसाला येउन बिस्कीट पुडे वाटतात किंवा पेशंटला गुलाब फुले किंवा बुके देतात , फोटो काढतात, पण मला असले फोटो काढून मिरवायचे नाही म्हणून मी ते फोटो बिटो च्या भानगडीत पडलो नाही.
मला तुम्हाला इथे असे सुचावाय्चेय कि अनेकजण वाढदिवसाला सामाजिक उपक्रम राबवत असतात, तर ज्यांना शक्य आहे त्यांनी जवळच्या कुठल्याही हॉस्पिटल मध्ये जाऊन या, तिथे अनेक लोकांना , रुग्णांना अनेक गोष्टींची गरज असते, त्यांच्या कुठल्यातरी गरजेला आपण उपयोगी पडलो तर ती जास्त सत्पात्री मदत होईल. आर्थिक अडचणीमुळे अनेक पेशंट आणि नातेवाईक गांजलेले असतात, त्यांच्या मदतीला धावून जावा. समाजात फार मोठी आर्थिक विषमता वाढलेली आहे, आपल्या परीने आपण जर गरजू लोकांची मदत केली तर ते खरे समाजोपयोगी काम होईल. समाजाप्रती आपले म्हणून काही देणे असते, ते आपण फेडलेच पाहिजे. " ज्यांची बाग फुललेली आहे त्यांनी त्यातील चार फुले इतरांना पण द्यावीत " हे खरे ना ?
कृपया माझे कौतुक करू नका. फक्त पोस्त जास्तीतजास्त शेअर करा, म्हणजे इतर लोक अशा मदतीला उद्युक्त होतील आणि गरजूंना मदत मिळेल. बाहेर आभाळ फाटलेय हो, आपण आपल्या परीने त्याला चार टाके मारुयात . जनसेवा हि ईश्वरभक्ती हे पद्य शाखेत शिकवले होते. ते इथे देतोय.
जनसेवा ही ईश्वरभक्ति बोध यातला उमजुया
विश्वासाने बंधुत्वाचे नाते सर्वा सांगूया
कालौघातच उभ्या राहिल्या भिंती जातीपतींच्या
अनेक जाती पंथ-गटानी धरिल्या वाटा भेदांच्या
भेद भेदुनि भिंती पाहुनि समरसता ती आणूया
विश्वासाने बंधुत्वाचे नाते सर्वा सांगूया ॥१॥
ग्रामवासी वा नगरनिवासी असोत कोणी वनवासी
एक संस्कृती अमर आपुली जोडू जीवन धारेशी
कालगतीच्या चक्रावरती पर्व नवे ते कोरूया
विश्वासाने बंधुत्वाचे नाते सर्वा सांगूया ॥२॥
कुणी राहो दुबळा येथे मनी असा निर्धार जागवु
कर्तृत्वाच्या विश्वासाने बलशाली हा समाज उभवु
उत्कर्षाची पहाट आणुन प्रकाश किरणे होऊया
विश्वासाने बंधुत्वाचे नाते सर्वा सांगूया ॥३॥
छायाचित्र सौजन्य : गुगल आंतरजाल सेवा.



1 comment:

  1. I read the post you posted previously.it affect me in such a way that I could not sleep that night.the day after I talk abt that post with my husband.he also had great impact of it .so if you help me I would like to celebrate my four grandkids birthday the way you did for your boss.i will send you money from here and you help the needy one,if that is ok with you Shreekantji. My husband has blood cancer and he is on hospice care.let me know what you think?

    ReplyDelete